नाशिक – अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुकचे खाते तयार करून धमकावणाऱ्या दोन जणांना बिहार राज्यातील बक्सार जिल्ह्यातून उपनगर पोलिसांनी अटक केली. अजय कुमार मिश्रा उर्फ बिकास शाहू, बनारसी गणेश दुबे हे दोन्ही आरोपींचे नावे आहे. त्यांच्याकडून पोलीसांनी तीन मोबाईल, एक जिओ फाय डोंगल ताब्यात घेतले आहे.
या दोघांनी महिलेच्या नावे एक बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यानंतर मुलीला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून त्रास दिला. यानंतर या मुलीचे फोटो एडीट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. व्हिडीओ कॉल करून अश्लील फोटो या संशयिताने काढून घेतले. यानंतर हे फोटो तिच्या फेसबुकच्या खात्यावर अपलोडदेखील करत बदनामी केली. हा प्रकार या मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या मोठ्या भावाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, यांच्या पथकाने तपास करत या संशयितांचे फेसबुक खाते, त्यावरील मोबाईल क्रमांक ट्रेस करून लोकेशन शोधले.