येवला – फळ विक्रेत्यांचे भांडण सोड़वायला गेलेल्या एकाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना शहरात घडली. फळ विक्रीचा व्यवसाय करत असलेला मनोज कुमार प्रभुदयाल कुशवाह हा भांडण सोडवायला गेलेला असतांना हा प्रकार घडला. या हल्ल्यात मनोज कुमार रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला असता त्याच्या इतर साथीदारांनी त्याला उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भांडण करत असलेला आरोपी ब्रिजेश कुमार रमाशंकर कुशवाह याला मनोजचा राग आला. त्याने मनोजच्या पाठीमागून अननस कापण्याच्या धारदार चाकूने वार केला. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांना मिळताच ते पोलीस निरिक्षक भगवान मथुरे,निरिक्षक नितीन खंडागळे आदींनी घटनास्थळी गेले. या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. येवला शहर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.