नाशिक – पत्नीच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला अटक
नाशिक – अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती दिलीप निंबाजी देवरे (वय ४९, पद्मरेखा सोसायटी, दादाजी कोंडदेवनगर) यांच्या विरुद्द गुन्हा दाखल झाला आङे. पत्नी सुवर्णा देवरे यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. वादानंतर दूर राहणाऱ्या पत्नीला रस्त्यात गाठून तिच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची पत्नीची तक्रार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पत्नी सुवर्णा तिच्या आई वडीलांकडे राहते. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पती दिलीपने जुना गंगापूर नाका भागात सिग्नलपर्यत त्यांच्या पत्नीचा पाठलाग केला. त्यानंतर पत्नीच्या दुचाकीवर बसून घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरला. मात्र सुवर्णा यांनी घरी जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाल्याने शिवीगाळ करीत जोरात गाडी चालवून पत्नीला घाबरविले. यातच पत्नीचा तोल गेला व ती रस्त्यावर पडली. यावेळेस पतीने पून्हा तिच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पत्नीने केली आहे.
नाशिक – एटीएम कार्डची आदलाबदल; २० हजाराला गंडा
नाशिक – एटीएम कार्डची आदलाबदल करीत सुमारे २० हजाराला गंडविल्याचा प्रकार दिंडोरी रोड वर म्हसरुळ परिसरात घडला आहे. दोघांनी बोलण्यात गुंतवून ही फसवणूक करण्यात आली आहे. पंकज दिनेश शर्मा (वय ३५, साईनगर अंधेरी इस्ट) अफसार अब्दुल गफार खान (सांताक्रूज ईस्ट मुंबई) संशयितांची नावे आहेत. गुरुवारी (ता.३०) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास दोघा संशयितांनी स्टेट बॅकेच्या मेरी शाखेत पैसे काढायला आलेल्या जयदीप गोपाल पगार (वय ३४, गुलमोहर नगर, दिंडोरी रोड) यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडील वडीलांच्या एटीएम कार्डची आदलाबदल करुन त्यांचे स्टेट बॅकेचे एटीएम कार्ड घेऊन त्याबदल्यात रुक्साना पठाण या नावाच्या महिलेचे एटीएम कार्ड सोपवून दुसऱ्या ठिकाणी एटीएम मधून खात्यातील २० हजार काढून फसवणूक केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित पंकज शर्मा याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक व्ही.के.माळी तपास करीत आहेत.