नाशिक – सोन्याचे बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणा-या सोनारासह चार जणांविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेत कर्ज खातेदार नितीन कातोरे, संतोष थोरात, तसेच अंबड शाखेचे कर्जदार रावसाहेब सुकदेव कातोरे यांनी मूल्यांकनकर्ता नीलेश विसपुते याच्याशी संगनमत केल्याचे उघड झाले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेतून १५ लाख ४० हजार २२१ तर अंबड शाखेतून ८ लाख ७८ हजार १७० रुपयांचे कर्ज घेऊन २४ लाख १८ हजार ३९१ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
या फसवणूक प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर शाखेचे मॅनेजर सुनील लक्ष्मण जोशी यांनी फिर्याद दिली आहे. या फसवणूक प्रकरणात नितीन कातोरे व संतोष थोरात या दोघांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचा कोणताही अंश आढळून आला नाही. यावरून या दोन्ही सोनेतारण कर्ज प्रकरणांत नीलेश विसपुते यांना हे दागिने बनावट असल्याचे माहीत असून देखील त्यांनी बनावट प्रमाणपत्र देऊन हे दागिने खरे असल्याचे बँकेला सांगितले. त्यामुळे विसपुतेसह कर्ज घेणा-यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.