नाशिक – पंचवटी पोलिसांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तिघा हल्लेखोरांना अटक केली आहे. मथिएस ऑगस्तुस एक्का, ललिता मथिएस एक्का, राहुल मथिएस एक्का, लविन मथिएस अशी आरोपींची नावे असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अमृतधाम परिसरात बुधवारी झडती वॉरंटची बजावणी करण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांच्या पथकावर या कुटुंबाने हल्ला केला होता.
याघटनेबाबत सविस्तर माहित अशी की, पंचवटी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज सोनवणे हे पथकासह श्रीरामपूर प्रथमवर्ग न्यायालयाने बजावलेल्या झडती वॉरंटची बजावणी करतांना ही घटना घडली. अमृतधाम परिसरातील त्रिकोणी बंगला भागात असलेल्या ललिता निवास (कालिकानगर) येथे मथिएस ऑगस्तुस एक्का (वय ६३) याने उपनिरीक्षक सोनवणे यांना धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच शासकीय गणवेशाच्या शर्टची कॉलर पकडून बटन व नेमप्लेट तोडून गळ्याला नखाने ओरखडले. तर ललिता मथिएस एक्का हिने पोलिस कॉन्स्टेबल राहुल लभडे यांना मारहाण करत गळ्याला नखाने बोचकारले. पोलिस नाईक लिलके यांना धक्काबुक्की करण्यात आली. रोहित व लविन एक्का यांनीही उपनिरीक्षक सोनवणे यांना धक्काबुक्की करत शासकीय कामकाजात अडथळा आणला. याप्रकारानंतर उपनिरीक्षक सोनवणे यांनी तक्रार नोंदवत मथिएस ऑगस्तुस एक्का, ललिता मथिएस एक्का, राहुल मथिएस एक्का, लविन मथिएस एक्का यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला असून यातील तिघांना अटक केली आहे. उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.