नाशिक – पेटीएम केवायसी अपडेट करण्याचे कारण देत एका महिलेला ४० हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करत या महिलेला तिचे पैसे मिळवून दिले आहेत. आर्थिक ओढाताण असतानाच महिलेला पैसे मिळाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनास झाला आहे. दुसरीकडे, नाशिक सायबर पोलिसांचे कौतुक केले जात आहे….
अधिक माहिती अशी की, सुजाता कर्डिले नामक महिलेला १४ फेब्रुवारी २०२० रोजी एक अनोळखी फोन आला. पेटीएम केवायसी अपडेट करण्याचे कारण सांगत या महिलेला क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने ते अॅप डाऊनलोड केले. रिमोट एक्सेस असलेल्या अपच्या माध्यमातून महिलेच्या बँक खात्यातून ३९ हजार ९९९ रुपये रुपये काढत फसवणूक केली. दरम्यान, महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर सायबर पोलिसांनी कसोशीने या घटनेचा तपास केला. महिलेने सांगितल्याप्रमाणे कॅनरा बँकेतून रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात बंगलोर येथे वर्ग झाल्याचे समोर आले. यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, संदीप बोराडे यांनी बंगलोर येथील बँकेचे ते खाते गोठवले. या खात्यात एकूण ५९ हजार रुपये होते. संपूर्ण खाते गोठवल्यानंतर आज या महिलेला ३९ हजार ९९९ रुपयांचा चेक नाशिक पोलिसांच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी उपस्थित होते. यावेळी महिलेने पोलिसांचे आभार मानले.