नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२६) वेगवेगळ्या भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यात २० वर्षीय तरूणासह ४८ वर्षीय इसमाचा समावेश आहे. दोघांच्याही नैराश्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात राहणा-या शहाबाज अब्दूल वाहिद चौधरी (२० रा.नुरी मज्जीद जवळ,संजीवनगर) या तरूणाने रविवारी अज्ञात कारणातून केवलपार्क रोडवरील भंदुरे मळा भागात असलेल्या दत्त मंदिर परिसरातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अब्दुल चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक केदारे करीत आहेत. दुसरी घटना आगर टाकळी भागात घडली. हमिद मुन्ना पठाण (४८ रा.भिमशक्तीनगर,आगरटाकळी) यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. सदर व्यक्ती मनोरूग्ण असल्याचे बोलले जात असून याप्रकरणी युसूफ पठाण यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार मुन्तोंडे करीत आहेत.