नाशिक : बाहेरगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळय़ातील पिशवीतून चोरट्यांनी छोटी पर्स चोरून नेल्याची घटना निमाणी बसस्थानकात घडली. पर्स मध्ये रोकडसह सोन्या चांदीचे दागिणे असा सुमारे सव्वा लाख रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता नितीन पाटील (३५ रा.भगूर ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील या शुक्रवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास कसबे सुकेणे येथे जाण्यासाठी निमाणी बसस्थानकात आल्या होत्या. शहर बसमध्ये त्या चढत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील शबनम पिशवीतील पर्स हातोहात लांबविली. या पर्स मध्ये तीन हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा १ लाख ११ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.