मारहाण प्रकरणी चौघांना अटक
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून दोन कुटूंबियात झालेल्या मारहाण प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मारहाणीची परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा श्रीराम ठाकरे (रा.श्रीराम संकुल,अशोकनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरूवारी (दि.२०) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आशा ठाकरे व त्यांचा मुलगा प्रफुल्ल घरात असतांना शेजारी आनंदा लहानू गांगुर्डे अजय लहानू गांगूर्डे,सागर रंगनाथ जाधव व किरण गायकवाड नामक व्यक्तींनी ठाकरे मायलेकास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिची सोन्याची पोत तुटून नुकसान झाले आहे. तर आनंदा गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रफुल श्रीराम ठाकरे व आशा ठाकरे यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संशयीतांनी आमच्या नादी लागाल तर गेम करून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी मायलेकांपैकी प्रफुल्ल ठाकरे यास तर दुस-या कुटूंबियांतील आनंदा गांगुर्डे,अजय गांगुर्डे आणि सागर जाधव यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आहेर व सुर्यवंशी करीत आहेत.
…..