नाशिक : दारू सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून मुलाने आपल्या वृध्दे आईच्या डोक्यात वजनी लोखंडी माप फेकून मारल्याची घटना संतकबीरनगर भागात घडली. या घटनेत वृध्दा जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू संतू व्यवहारे (२५ रा.महाराष्ट्र बेकरी समोर,संतकबीरनगर) असे संशयीत निर्दयी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी यमुनाबाई संतू व्यवहारे (६०) या माऊलीने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यमुनाबाई आपल्या घरात असतांना संशयीताने तिच्याकडे दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. मात्र यमुनाबाई यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त पोटच्या मुलाने शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देत जवळच पडलेले एक किलो वजनाचे लोखंडी माप आपल्या आईला फेकून मारले. या घटनेत यमुनाबाई जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.