नाशिक : जेलरोड भागात सुरू असलेला जुगार अड्डा शहर पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत पाच चारचाकी वाहनांसह एक बुलेट आणि रोकड असा सुमारे ६८ लाख ९२ हजार ०५० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांच्या पथकाने केली. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरातील अवैध धंदे मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठांकडून पोलीस ठाणे निहाय अवैध धंद्याची गोपनिय माहिती संग्रहीत केली जात आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जेलरोड येथी सतिश रघुनाथ भालेराव याचा राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खरात यांना मिळाली होती. सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांच्या पथकाने इडती वॉरट बजावत ही कारवाई केली. धुमाळ यांनी मोठ्या फौजफाट्यात पाण्याच्या टाकी समोरील कैलासजी सोसायटीतील बंदीस्त फ्लॅटवर छापा टाकला असता २७ इसम जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. या कारवाईत संबधीतांना बेड्या ठोकत पोलीसांनी रोकडसह पाच कार आणि एक नवी कोरी बुलेट असा ६८ लाख ९२ हजार ०५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.