नाशिक : बँक ऑफ इंडियाच्या आडगाव शाखेत मदतीचा बहाणा करत नोटांच्या बंडलमधून परस्पर ३४ हजार रूपये हातोहात भामट्याने लांबविले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषदेवी राजा नांगलिया (५० रा.वृंदावननगरी,मेरी लिंकरोड हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संतोषीदेवी यांनी बँक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रकरण सादर केले होते. हे कर्ज मंजूर झाल्याने त्या सोमवारी (दि.१३) दुपारी पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या असता ही घटना घडली. कॅशिअरने पैसे दिल्यानंतर संतोषीदेवी यांच्या पाठीमागे रांगेत उभ्या असलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना पैसे मोजण्यास सांगून हा गंडा घातला. मावशी नोटा तपासून बघा, बंडल मध्ये कमी पैसे निघतात असे सांगितल्याने संतोषीदेवी यांनी दोघांची मदत घेत पैसे मोजण्यास लावले असता त्यांनी बंडल मधील नोटा मोजत असतांना ३४ हजार रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.