नाशिक : भद्रकाली बाजारात कपडे खरेदीसाठी आलेल्या वृध्द बहिण भावास चोरट्याने तब्बल सव्वा लाखास गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्नतजिम सिराजउद्दीन मुल्ला (७५ रा.ब्रम्हगिरी कॉलनी,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. मुनतजिम मुल्ला आणि त्यांची बहिण अकीकुज जोहरा हे दोघे बहिण भाऊ रविवारी (दि.१९) भद्रकाली बाजारात कपडे खरेदीसाठी आले होते. इंडिया क्लॉथ स्टोअर्स येथे कपडे खरेदी करून दोघे दुकानाबाहेर पडले असता ही घटना घडली. २५ ते ३० वयोगटातील एका भामट्याने त्यांना गाठले. परिचीत असल्याचे भासवून त्याने कोरोना महामारीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जिल्हारूग्णालयात पैसे वाटतात असे सांगून त्याने दोघा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आणले. या ठिकाणी दोघांना आपले दागिणे काढून बॅगेत ठेवण्याचा सल्ला देत हा गंडा घातला. वेगवेगळय़ा ठिकाणी उभे करून त्याने दोघांच्या बॅगा पळवून नेल्या. या बॅगांमध्ये दागिणे,नव्याने खरेदी केलेले कपडे,रोकड व बँकेचे कागदपत्र असा सुमारे १ लाख १२ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.