गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी
नाशिक – नाशिक शहर व ग्रामीण भागातून मोटर सायकल चोरी करणारे दोन चोरटयांना तीन मोटर सायकलसह जालना जिल्ह्यातील मंठा येथे अटक करण्यात आली. या चोरांबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर तसेच ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. पोलिस तपास करीत असताना गुन्हेशाखा युनिट क्रं. २ चे पोलीस नाईक विजय वरंदळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे संपूर्ण कारवाई करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्यातील ३७९ मधील फिर्यादी राजू दत्तु चौधरी, रा. उत्तमनगर, सिडको यांचे मालकीची स्प्लेन्डर मो.सा. क्र. एम. एच१५/डि.ए./४४४६ ही ०५/१२/२०२१ रोजी घरासमोरून रात्री १०:३० वा. पार्क केली असता ती चोरी केली होती. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. रेकॉर्डवरील गुन्हेगार विठ्ठल बचेराव वरकड रा. मंठा, जि. जालना त्यांचा साथीदार किसन उर्फ अजय शाहु साठे, रा. झरी ता. मानवत जि. जालना येथे चोरी केलेली मोटार सायकल मंठा, जि. जालना येथे चोरी छुपी वापर करीत आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना सांगून त्यांचे मार्गदर्शनान्वये पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश घडवजे,पोलीस हवालदार सोमनाथ शार्दुल, संजय सानप,पोलीस नाईक विजय वंरदळ,पोलीस शिपाई योगेश सानप आणि इतर कर्मचाऱ्यांची पथक पाठवून त्यांनी मंठा जि. जालना येथे शोध घेवुन सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोलपणे चौकशी करून ताब्यात घेतले. नाशिक शहरातील २ गुन्हयातील व नाशिक ग्रामीण सिन्नर पोलीस ठाणे येथील ०१ गुन्हयातील अशा ०३ मोटर सायकल असा एकुण १,८०,०००/- रू.किं. मुद्देमाल हस्तगत करून आरोपी व मुद्देमाल अंबड पोलीस ठाणे यांचेकडे पुढील तपास साठी ताब्यात देण्यात आले आहे. शहरातील अंबड, सिन्नर तसेच विविध पोलिस ठाण्यातील गुन्ह्याची यामुळे उकल होणार आहे. सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचे मार्गदर्शना खाली गुन्हेशाखा युनिट कं. २ कडील अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोपट कारवाळ, रमेश घडवजे,सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी,पोलीस हवालदार सोमनाथ शार्दुल, संजय सानप, संपत सानप, राजाराम वाघ, संपत सानप, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, मधुकर साबळे, विजय वरदळ, यादव डंबाळे, योगेश सानप यांनी केलेली आहे.