नाशिक – महापालिकेच्या सिटीलिंक बसने घेतला पहिला बळी; चालक फरार, गुन्हा दाखल
नाशिक – शहरातील महापालिकेच्या सिटीलिंक बसने पहिला बळी घेतला. पादचाऱ्याला उडवून दिल्यानंतर चालक फरार झाला. द्वारका उड्डाणपूलाखाली शहर बसच्या धडकेत पादचारी ठार झाला. शुक्रवारी (दि.१७) अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. रिझवान मोहम्मद सैय्यद (टाकळी रोड जुना कथडा) याच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी दुपारी आडगावच्या दिशेने द्वारकाकडे येणाऱ्या महापालिकेच्या शहर बस (एमएच १५ जीव्ही ७७२३) हिने धडक दिल्याने द्वारका उड्डाणपूलाखाली रस्ता ओलांडणारा पादचारी ठार झाला. अपघातानंतर कुठलीही माहीती न देता चालक पळून गेला म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उसने पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करीत कपाळावर काचेचा ग्लास फोडला, गुन्हा दाखल
नाशिक – सराईताला उसने पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करीत कपाळावर काचेचा ग्लास फोडून एकास जखमी केल्याची घटनना मुंबई नाका परिसरात घडली आहे. मिलींद मनोहर भालेराव उर्फ दुल्या (नागसेननगर, वडाळा) असे सराईताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी समीर रमेश आठल्ले (वय ४४, भाभानगर) हे गुरुवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील पंचमी हॉटेलात जेवण करीत असतांना सराईत मिलींद उर्फ दुल्या तेथे आला व उसने पैसे मागू लागला त्याला उसने पैसे न दिल्याने त्याने शिवीगाळ करीत काचेचा ग्लास समीरच्या कपाळावर मारला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.