जिल्हा रूग्णालयात तरुणाकडून शिवीगाळ, गुन्हा दाखल
नाशिक : इंजेक्शन वाटप सुरू असतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यास सांगितल्याने संतप्त तरूणाने डॉक्टरांसह कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याची घटना जिल्हा रूग्णालयातील मेडिकल स्टोअर्स भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्ये व मालमत्ता हानी किंवा नुकसान प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ.संजय माधवराव गांगुर्डे (रा.गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. रूग्णालयातील मेडिकल स्टोअर्स येथे डॉ. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनासाठी इंजेक्शन वाटप सुरू होते. यावेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी डॉ. गांगुर्डे यांनी कोवीड १९ प्रतिबंधक कायद्याचे पालन करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आदेश दिल्याने हा वाद झाला. रांगेतील ३० वयोगटातील तरूणाने कुठलेही कारण नसतांना थेट डॉ. गांगुर्डे यांच्यासह कर्मचारी सोनवणे,पाटील व हितेश यांना शिवीगाळ केली. वरिष्ठांच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकविपुरे करीत आहेत.
…..