नाशिक : शहरात चैनस्नॅचरांचा सुळसुळाट झाला असून दुचाकीस्वार आणि पादचारी महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिणे दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॉलेज रोड भागातील विद्या गोपाळ निटटूरकर (रा.लेन.नं.२,कुलकर्णी बाग) या गेल्या शनिवारी (दि.४) रात्री प्रसाद मंगल कार्यालयाकडून किलबिल शाळेच्या रस्त्याने आपल्या दुचाकीवर घराकडे प्रवास करीत असतांना ही घटना घडली. समोरून येणा-या दुचाकीस्वारांने त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले.याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना गुलमोहर नगर भागात घडली. याप्रकरणी रंजना सुभाष कदम (रा.गुलमोहरनगर,म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. कदम बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास मैत्रीणीसमवेत नेहमीप्रमाणे परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात देवदर्शनासाठी जात असतांना ही घटना घडली. राज समर्थ सोसायटी समोर समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.