नाशिक : बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओवर दरोडा टाकणा-या टोळीतील दोघांना मुद्देमालासह गुन्हेशाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली. संशयीतांकडून सुमारे २ लाख ५६ हजार १८६ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अगोदरच टोळीतील चार जणांना ठाणे जिल्ह्यातील धाकटे शहाड येथून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडा टाकून चोरलेल्या वस्तू धातूचे भाग कापणा-या व ते लपवून ठेवणा-या संशयितांचा शोध घेतला असता दोघा संशयीतांना अंबड औद्योगीक वसाहतीतील आझादनगर भागात बेड्या ठोकण्यात आल्या. अब्दुल अजीज मोहब्बत अली खान (४५) आणि मोहियोद्दीन मुमताजअली खान (४० रा.दोघे आझादनगर,अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
गर्गे स्टुडिओवर शुक्रवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला होता. याबाबत सुरक्षारक्षक जयदेव जाधव (गर्गे स्टुडिओ) यांनी तक्रार दाखल केली होती. चारचाकी वाहनातून आलेल्या आठ ते १० जणांच्या टोळक्याने जाधव यांना बेदम मारहाण केली. तसेच पत्नीस कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने कारखान्यातील कांस्य धातुचे पुतळे, १०० किलो वजनाची तलवार व वीणा असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पकडलेल्या दोन संशयीताच्या ताब्यातून कांस्य धातूची विणा, तलवार व पुतळ्याचा भाग असा दोन लाख ५६ हजार रुपये किंमतीचा ४०० किलो वजनाचा मु्ददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडूनही टोम्पो व मोबाईल असा ११ लाख ८६ हजार १३८ रूपयांचा मुद्देमाल आत्तापर्यंत हस्तगत करण्यात आला आहे. दोघा संशयितांना मुद्देमालासह सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून मोहियोद्दीन खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी दरोडा व चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.