नाशिक – पोलीसांनी शहरात मंगळवारी कोम्बींग ऑपरेशन राबवत सहा तडिपारांसह रेकॉर्डवरील २४ गुन्हेगार पोलीसांना ताब्यात घेतले आहे. वर्ष भराच्या कालावधीनंतर पोलीसांनी मध्यरात्री अचानक शहरातील पोलीस ठाणे निहाय आणि मुख्यालयातील ११२ पोलिस अधिकारी व ७८६ अंमलदारांचा ताफा शहरातील रस्त्यांवर उतरला. ठिकठिकाणी नाकाबंदी, झोपडपट्यांमध्ये आणि विविध भागात राहणा-या गुन्हेगारांची शोधमोहिम राबवण्यात आली. शहरातील अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अवैध मद्यसाठा वाहतूक, विक्री व साठा केल्याप्रकरणी २६ ठिकाणी कारवाई झाली तर अवैध जुगार प्रकरणी ७ व गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विरोधात तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३६ ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या परिसरांतून एक गावठी कट्टा व इतर धारदार ९ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेले व हद्दपारीची कारवाई केलेले सहा तडिपार आणि पोलीस रेकॉर्डवरील २४ सराईत गुन्हेगारही पोलीसांच्या हाती लागले आहेत.