नाशिक – दोन दिवसापूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीतील ४ जणांना आडगाव पोलीसांनी पालघर जिल्ह्यातील विरार व वाडा येथून ताब्यात घेतल्यानंतर आता पोलिसांच्या हाती या टोळीतील मुख्य सुत्रधार लागला आहे. या आरोपीला पोलीसांनी पालघर जिल्ह्यातील उमराळे येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६३ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहे. यातील ६२ इंजेक्शन विना लेबल तर एक लेबल असलेले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सिध्देश अरुण पाटील हा बोईसर येथील कमला लाईफ सायन्स प्रा,लि. या इंजेक्शन बनवणा-या कंपनीत काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणात १४ मे रोजी पोलीसांनी के.के. वाघ कॉलेजजवळ सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर या प्रकरणी औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रेमडेसिवीरची जादा दरात विक्री करणाऱ्या चौघांना अगोरदर अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तिन्ही महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत, तर चौथा आरोपी मेडिकल बॉय होता. त्यानंतर या दाखल गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी दोन दिवसापूर्वी पालघर मधून चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून २० इंजेक्शन जप्त केले होते. त्यामुळे या गुन्हयात आता ९ जण आरोपी झाले आहे.
आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, यांनी या काळाबाजाराचा भांडाफोड केला आहे.