नाशिक : मित्रमैत्रीणीसमवेत गप्पा मारत उभ्या असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यास बेदम मारहाण करीत टोळक्याने चाकू हल्ला केल्याची घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. या घटनेत सदर तरूण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश नागेंद्र सिंग (रा.शेलार सभागृहा समोर,गजानननगर पाथर्डी फाटा) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यश सिंग शुक्रवारी (दि.३) उत्तमनगर येथील महाविद्यालयात गेला होता. दुपारी बारा वाजेच्या सुमारास तो कॉलेज समोरील सौरभ स्टेशनरी परिसरातील मटका बोळीत आपल्या मैत्रीणी समवेत गप्पा मारत उभा असतांना ही घटना घडली. बोळीतून जाणाºया तीन जणांच्या टोळक्याने आमच्याकडे काय पाहतो असे म्हणून मित्रासमोर वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या त्रिकुटाने येथून निघून जा असे म्हणत यश यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने कमरेचा धारदार चाकू काढून यशवर सपासप वार केले. या घटनेत डोक्यावर,मानेवर आणि पाठीवर वार करण्यात आल्याने यश सिंग जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.