नाशिक – मेडिकल फोडून चोरट्यांनी १ लाख ३७ हजार रूपयाचा ऐवज केला लंपास
नाशिक : बंद मेडिकल फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह डिव्हीआर आणि मोबाईल असा सुमारे १ लाख ३७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना तिडके कॉलनी भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन प्रेमचंद उत्तमचंदानी (रा.त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. उपचंदानी यांचे अहिल्याबाई होळकर मार्गावरील नवजीवन हॉस्पिटलच्या तळमजल्यावर केअर क्लिनीक व केअर फार्मा नावाचे मेडीकल स्टोअर्स आहे. शनिवारी (दि.२७) रात्री चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर तोडून गल्यातील १ लाख १९ हजाराची रोकड, डिव्हीआर आणि मोबाईल असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
३४ वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या
नाशिक : म्हसरूळ परिसरातील गुलमोहर कॉलनीत राहणा-या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शैलेश विजय पाटील (३४ रा.अभिषेक विहार,गुलमोहर कॉलनी) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांनी सोमवारी (दि.२९) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी कल्पेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.