नाशिक : भरधाव दुचाकीवरून पडल्याने २५ वर्षीय परप्रांतीय युवकाचा मृत्यु झाला. हा अपघात भगूर येथे झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकी चालकास अटक करण्यात आली आहे. सागर जगन झांझरे (२५ मुळ.रा.सुरत,गुजरात) असे दुचाकीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. झांझरे रविवारी (दि.२८) रात्री मित्र श्रीनाथ प्रल्हाद साळूंके (२५ रा.कल्याणी खुर्द,जि.जळगाव) याच्या प्लॅटीना दुचाकीवर एमएच १९ डीएम २२२८ डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दोघे मित्र बलकवडे व्यायाम शाळेकडून राजवाड्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना विसाव्या ओट्याजवळ ही घटना घडली. भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर आदळल्याने पाठीमागे बसलेला सागर झांझरे हा रस्त्यावर पडला होता. या घटनेत डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यास कॉन्टोमेंट हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुकणे करीत आहेत.