नाशिक : शहर परिसरात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोघा पादचारींचा मृत्यु झाला. रस्ता ओलांडत असतांना भरधाव वाहनांनी धडक दिल्याने २० वर्षीय तरूणासह ५० वर्षीय अनोळखी इसम ठार झाला. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात पसार झालेल्या वाहनचालकांविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंबोळा ता. देवळा येथील सिध्दांत हिरामण आहिरे (२०) हा तरूण शनिवारी (दि.२७) अमृतधाम येथील कांचन किचन ट्रॉली दुकानाजवळ रस्ता ओलांडत असतांना अमृतधामकडून तारवालानगरच्या दिशेने भरधाव जाणा-या कंटेनरने एनएल ०१ क्यू ६१५३ त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृत तरूणाची बहिण श्रध्दा वाघ यांनी तक्रार दाखल केली असून कंटेनरचालक आपले वाहन सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पठारे करीत आहेत. दुसरा अपघात महामार्गावरील द्वारका भागात झाला. निखील नाईक (रा.काझीपुरा,जुने नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. ५० वर्षीय अनोळखी पुरूष रविवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास उड्डाणपुलाखालील पोल नं. ७३ – ७४ भागात रस्ता ओलांडत असतांना धुळ््याकडून द्वारकाच्या दिशेने भरधाव जाणाºया टँकरने एमएच ४१ एयू ९१९१ त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात अनोळखी इसम ठार झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.