नाशिक : वडाळा पाथर्डी मार्गावरील विकास कॉलनी भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ४० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत राजेंद्र घोडेकर (रा.शमबन्सी अपा.पार्क साईड समोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. घोडेकर कुटुंबिय रविवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास खरेदी करण्यासाठी बाजारात गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील ४० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख २४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.