नाशिक : जुन्या वादाच्या कारणातून टोळक्याने दोघा भावांसह त्यांच्या मित्रांचा सिनेस्टाईल पाठलाग करून बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली. या घटनेत एकास दगड फेकून मारण्यात आल्याने तो जखमी झाला असून,पोलीसांनी चार संशयीतांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम सुनिल पवार ,सोनू उर्फ संतोष संजय कटारे,मोनू उर्फ अक्षय संजय कटारे,निखील भगवान जाधव (रा.सर्व शिंदे गल्ली,राजवाडा गंगापूरगाव) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून त्याचे अभिजीत उर्फ बिबट्या भवर,हरीश भवर,सुरज शिंदे आदी साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी शुभम रंगनाथ मधे (रा.कोळीवाडा,गोवर्धन) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
शुभम मधे रविवारी (दि.१६) गंगापूर गावातील दे.ना.पाटील शााळेच्या मैदानात क्रिकेट खेळत असतांना ही घटना घडली. संशयीतांनी शाळेचे मैदान गाठून सोनू आरोटे याच्या हातातील लाकडी बॅट हिसकावून घेतली. यावेळी जुन्या वादाच्या कारणातून शुभम मधे यास बॅट आणि स्टॅम्पने शुभम मधे यास बेदम मारहाण केली. यावेळी कशी बशी सुटका करून घेत मधे याने गंगापूर गावाच्या दिशेने पळत सुटला असता संशयीतांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास पुन्हा दर्गा भागात पकडले. यावेळी शुभमचा भाऊ लक्ष्मण मधे,रूपेश कुवर,सचिन श्शिंदे हे मित्र त्याच्या मदतीला धावून आले असता टोळक्याने त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली.यावेळी दोघा भावांसह मित्रांनी टोळक्याच्या तावडीतून सुटका करून घेत कोळीवाड्याच्या दिशेन पोबारा केला असता संशयीतांनी जीवे मारण्याची धमकी देत दगडफेक केली. या घटनेत मित्र सचिन शिंदे जखमी झाला असून अधित तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.