नाशिक : शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.२८) वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड,आडगाव आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील किशोर गंगाराम सैंदाणे (५१ रा.दत्तचौक) यांनी रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात हॉलमधील छताच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुलगा मितेश सैंदाणे याने दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना औरंगाबाद रोडवरील तपोवन भागात घडली. नितीन दिलीप कोष्टी (३० रा.नक्षत्र अपा.रूचीरा हॉटेल जवळ) यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून घरातील हॉलमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी गणेश अवनकर यांनी दिलेल्या खबरी वरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. तर पाथर्डी गावातील मोहन परशराम बेडेकर (रा.रमेश जगताप यांच्या घरात कडवे गल्ली,शिवाजीचौक) यांनी रविवारी आपल्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अॅगलला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी किशोर नागरे यांनी खबर दिल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.