नाशिक : किरकोळ कारणातून तीन जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. या घटनेत एकाने धारदार चाकूने वार केल्याने तक्रारदार जखमी झाला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश भगवान मराठे,भगवान भिमसेन मराठे व दिपक वसंत मराठे अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी साईनाथ गणेश मोरताटे (रा.भगतसिंग चौक,पवननगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मोरताटे आणि रोशन मुर्तडक हे दोघे मित्र गुरूवारी (दि.२५) पवननगर पाण्याची टाकी भागातील मैदानावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. दोघे मित्र ग्राऊंडवर चक्कर मारत असतांना रितेश मराठे याने दोघांना गाठून माझ्याकडे काय बघतो असे म्हणून वाद घातला. यावेळी मोरताटे याने मी तुझ्याकडे का बघू असे उत्तर दिल्याने ही घटना घडली. संतप्त मराठे टोळक्याने दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत एकाने मोरताटे याच्यावर धारदार चाकूने वार केले. या घटनेत मोरताटे जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.