नाशिक : मुलांना क्रिकेटच्या शिकवणीसाठी घेवून चाललेल्या दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील सोन्याची पोत भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूररोडवरील संतकबीर मार्गावर घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता महिंद्र बडगुजर (रा.भावांजलीनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. बडगुजर या गेल्या बुधवारी (दि.२४) मुलांना क्रिकेटच्या शिकवणीसाठी पारिजातनगर येथे अॅक्टीव्हा दुचाकीवर घेवून जात असतांना ही घटना घडली. संतकबीर मार्गावरील बुरकुले हॉस्पिटल समोरून त्या प्रवास करीत असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख १० हजार रूपये किमतीची सोन्याची दुपदरी पोत ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.