नाशिक : जमिन हडप करण्याच्या उद्देशाने जुन्या तारखेचा साठेखत करारनामा करीत व मुळ जमिन मालकास हाताशी धरून दुबार नोंदणी केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीकांत मधुकर कुलकर्णी (रा.समर्थनगर,कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन रम्मी राजपुत,विष्णू नथू पालवे व अॅड. ए.आय.शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूकीबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुलकर्णी व त्यांच्या भागीदारांनी संशयीत विष्णू पालवे यांच्याकडून त्र्यंबकेश्वर शिवारातील सर्व्हे नं.२११ मधील क्षेत्र १ हेक्टर ७७ जमिन नोंदणीकृत खरेदीखत करून विकत घेतली आहे. याबाबत भूमाफिया रम्मी राजपूत यास माहिती असतांना त्याने जमिन मालक विष्णू पालवे व त्याच्या कुटुंबियांना धमकावित आणि हाताशी धरून कुलकर्णी यांनी खरेदी केलेली जमिन हडपण्याच्या उद्देशाने कट रचला. सन.२०१३ मध्ये अॅड.ए.आय.शेख यांच्या नाशिक रोड येथील मंगल सोसायटीतील कार्यालयात त्याबाबत साठेखत करारनामा करण्यात आला. मात्र हा करारनामा ८ एप्रिल २०१० रोजी केल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर दुय्यम निबंधक कार्यालयात १० सप्टेंबर २०१३ रोजी दस्त नोंदणी करून जमिनीच्या सात बारा उता-यावर स्व:ताचे नाव लावून फसवणुक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर करीत आहेत.