नाशिक : शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, बुधवारी (दि.२४) वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील दोघी मैत्रीणी शिकवणीसाठी तर एक मुलगी आपल्या मावशीच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. तिघींनाही कुणी तरी फुस लावून पळविल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविल्याने इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा भागातील विक्रीकर भवन जवळ राहणा-या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या मुलीस बुधवारी सकाळच्या सुमारास तिची मैत्रीण शिकवणीसाठी बोलविण्यास आली होती. दोघी मैत्रीणी शिकवणीस जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या त्या अद्याप परतल्या नाही. सर्वत्र शोध घेवूनही त्या मिळून न आल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून त्यांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी बुधवारी दुपारच्या सुमारास देवळाली गावातील सोमवार बाजारात राहणा-या मावशीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परली नाही. मित्र मैत्रीणी,नातेवाईक यांच्यासह सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून तिनेही कोणी तरी मुलीस पळवून नेल्याचा संशय व्यक्त केल्याने उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.