नाशिक : सदनिका खरेदीचा करारनामा करून लाखोंची रक्कम उकळून बांधकाम व्यावसायीकाने ग्राहकास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. सदनिकेचा ताबा न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम कस्ट्रंक्शन्स अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चरचे भागीदार अभिजीत उर्फ राजेश आनंदीलाल वर्मा (रा.कॉलेजरोड) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतुल अशोक आव्हाड (रा.जेलरोड,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. ओम कन्स्ट्रक्शनच्या तारवाला नगर येथील ओम प्रेमराज एनक्लेव्ह या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आव्हाड यांनी सदनिका बुक केली होती. फ्लॅट क्र. २०९ हा पसंतीस पडल्याने आव्हाड यांनी ११ एप्रिल २०१७ रोजी नोंदणीकृत करारनामा केला होता. त्यापोटी संशयीत वर्मा यांना प्रथम चार लाख ३२ हजार व अनुक्रमे ३ आणि पाच लाख रूपये धनादेशाद्वारे अदा करण्यात आले. याबरोबरच स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून केलेले २० लाख रूपयांची गृहकर्जाची रोकडही वर्मा यांच्याकडे स्वाधिन करण्यात आली होती. व्यवाहारानुसार २४ लाख ३२ हजार रूपयांची रक्कम बांधकाम व्यावसायीकाच्या स्वाधिन केलेली असतांनाही बांधकाम पूर्ण होवूनही संशयीतांनी सदनिकेचा ताबा दिला नाही तसेच पैसेही परत केले नाही. या मुळे तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून बांधकाम व्यावसायीकाने बँकेची आणि आपली फसवणूक करून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.