नाशिक – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीतील ४ जणांना आडगाव पोलीसांनी पालघर जिल्ह्यातील विरार व वाडा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१ हजार रुपये किंमतीचे २० रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेतले. या चारही आरोपींना न्यायालयाने १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. याअगोदरच पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची संख्या आता आठ झाली आहे. त्यामुळे ही मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे.
१४ मे रोजी औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी या चार जणांना अटक केली आहे. आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजयकुमार सुर्यवंशी, दशरथ पागी, पोलिस कॅान्स्टेबल सचिन बहिकर, वैभव परदेशी, विश्वास साबळे, देवानंद मोरे, यांनी या आरोपींना पकडण्याची कामगिरी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहे.
१४ तारखेला झाली होती चार जणांना अटक
रेमडेसिवीरची जादा दरात विक्री करणाऱ्या चौघांना १४ मे रोजी चार जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तिन्ही महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत, तर चौथा आरोपी मेडिकल बॉय आहे. पोलीसांनी के.के. वाघ कॉलेजजवळ सापळा रचून ही कारवाई केली होती. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.