नाशिक : गैरकारभार वरिष्ठांना कळविल्याने पदाधिका-यांनी सामाजीक बहिष्कार टाकत मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवल्याचा आरोप धार्मिक संस्थानच्या सभासदाने केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द बहिष्कृत संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद गायकवाड,अनिल वंजारे,प्रविण घुले,विनायक पंडीत व प्रशांत पगारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी रूपेश निकाळजे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार निकाळजे नाशिक रोड येथील संत फिलीप चर्च या धार्मिक संस्थेचे सभासद असून बिशप आॅपचे रेव्ह शरद गायकवाड यांनी केलेला गैर कारभार व घटनाबाह्य कामांची माहिती वरिष्ठांना दिल्याने धर्म प्रांत पदाधिका-यांनी खोटे आरोप व ठराव करून निकाळजे यांना धार्मिक संघटनेचे चर्च,डायसेस व ट्रस्ट या संघटनामधून तसेच निवडणुकीमध्ये भाग न घेण्याचे,मतदान न करण्याबाबत नोटीस देवून प्रत्यक्ष सामाजिक दृष्ट्या बहिस्कृत केले.निकाळजे यांना त्यांच्या मुलभूत हक्का पासून वंचित ठेवून त्यांची बदनामी व सामाजीक आधिष्ठाला इजा पोहचविली. तर पगारे यांनी ख्रिस्ती समाजाच्या व्हॉटसअप ग्रुपवर सर्व पत्र पाठवून तक्रारदार यांची बदनामी व मानहानी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.