नाशिक – शहर बसमधून प्रवास करीत असतांना महिलेच्या बॅगेतील पाकिट चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : महापालिकेच्या शहर बसमधून प्रवास करीत असतांना महिलेच्या बॅगेतील पाकिट चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना नाशिकरोड ते सिडको दरम्यान घडली. पाकिटात रोकड,सोन्याचांदीचे दागिणे आणि अमेरिकन डॉलर असा सुमारे २ लाख ८० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूणा विलास कासलीवाल (६२ रा. शुभम पार्क,अंबड लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कासलीवाल गेल्या मंगळवारी (दि.१६) बाहेरगावाहून आपल्या घरी परतल्या. रेल्वे प्रवासानंतर त्या नाशिकरोड ते सिडको या बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील प्लॅस्टीक पिशवीत ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये ८७ हजार ५०० रूपयांची रोकड,१२५० अमेरिकन डॉलर व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ८० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.
२२ वर्षीय तरूणीने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : नाशिक पुणा मार्गावरील आंबेडकर वाडी भागात राहणा-या २२ वर्षीय तरूणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निकीता कैलास खाने (रा.सिध्दार्थ हॉटेल समोर,आंबेडकरवाडी) असे आत्महत्या करणाºया तरूणीचे नाव आहे. निकीता खाने हिने बुधवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल कैलास खाने यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.