नाशिक : घरगुती गॅस अॅटोरिक्षात भरून देण्याचा अड्डा पोलीसांनी उदध्वस्त केला. तिगरानिया रोडवरील भागात हा अड्डा राजरोसपणे सुरू होता. पोलीसांनी अॅटोरिक्षासह भरलेली आणि रिकामी सिलेंडर असा सुमारे १ लाख ६१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल बिलाल पठाण (रा.अमरधामरोड) व गुलाम अयूब पठाण (रा.जहागिरवाडा,बागवानपुरा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक उत्तम पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. तिगरानीया रोडवरील आसिफ जानोरी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वाहनात घरगुती गॅस भरून दिला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास पोलीसांनी सापळा लावून छापा टाकला असता तेथे एमएच १५ एफयू ०७०९ या अॅटोरिक्षात गॅस भरतांना संशयीत मिळून आले. घटनास्थळावरून अॅटोरिक्षासह भरलेली आणि रिकामी सिलेंडर, गॅस भरण्याचे इलेक्ट्रीक मशिन आणि वजन काटे असा सुमारे १ लाख ६१ हजार ७७० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.