नाशिक – सिडको येथील उपेंद्र नगर येथे टिप्पर गँगच्या गुंडांकडून महिलेस मारहाण होत नाही तोच दुसऱ्या दिवशी सुंदरवन कॉलनीतील नागरिकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून समाजकंटकांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सिडको परिसरातील लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी ( दि .१६ ) रात्री अज्ञात समाजकंटकांनी सात कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे . लेखानगर भागातील सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री दोन ते तीन दुचाकी वर ३ ते ४ अज्ञात समाजकंटक आले व त्यांनी काठी व दगडाने घरासमोर पार्किग केलेल्या सात कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली व फरार झाले. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दाखल झाले . अज्ञात समाजकंटकांनी कारच्या काचा का फोडल्या हे अद्याप समजू शकले नाही . काचा फोडणारे आरोपींची माहिती मिळाली असुन लवकरच त्यांना अटक केले जाईल असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.
यास समाजकंटकांनी मागच्या वर्षी देखील असाच गाडी फोडण्याचा प्रकार येथे केला होता. याबाबत येथील नागरिकांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवायची का ? असा प्रतिसवाल करून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यास असमर्थता दर्शवल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
…..
कठोर कारवाई करण्यात यावी
मागच्या वर्षी देखील याच समाजकंटकांना गाड्या फोडल्या होत्या. या वर्षी देखील त्यांनी सात गाड्या फोडल्या पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
सुदर्शन बच्छाव, नागरिक, सुंदरबन कॉलनी, सिडको