दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू
नाशिक : दुचाकी दुभाजकावर आदळ्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक धनदाई लॉन्स, मखमलाबाद रोड, पंचवटी येथे घडली. विशेष म्हणजे, दुचाकीचालकाने लायन्ससुद्धा काढले नसून, विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे समोर आले. मृत तरुण हा दुचाकीचालकाचा सख्खा भाऊ आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार धनराज विठ्ठल पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विवेक नरेश वराडे (वय २७, रा.दत्तनगर, श्री बिल्डींग, पेठरोड, पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंद नरेश वराडे (वय २४, रा.दत्तनगर, श्री बिल्डींग, पेठरोड, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विवेक वराडे हे लायन्स नसतानाही विनाहेल्मेट दुचाकी (एमएच १५-एफ ४०८१)वरुन भाऊ आनंदसमवेत मखमलाबाद रोडने जात होते. त्यावेळी अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत होता. दरम्यान, विवेकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीचा अचानाक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावरुन आदळली. त्यात आनंद वराडे याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चोपडे करत आहेत.
न्यायालयात भांडण; महिलांवर गुन्हे
नाशिक : शांतता भंग करत दोन महिलांनी भांडण केल्याची घटना मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालय, नाशिक येथील परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार गायकवाड यांनी गायकवाड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित कोमल समर साळवे (वय ३२, रा.लोखंडेमळा, नाशिकरोड), अनुराधा धनराज परदेशी (वय २५, रा.इगतपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित महिला एकमेकांच्या डोक्याचे केस ओढत भांडत होत्या. त्यावेळी दोघी मोठमोठ्या ओरडत होत्या. दोघींनी न्यायालय परिसरात शांतता भंग केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस नाईक साबळे करत आहेत.
घरात घुसून वृद्धाला मारहाण
नाशिक : घरात घुसून अनोळखी दोन तरुणांनी वृद्धाला बेदम मारहाण केल्याची घटना पाटोळेमळा, जयभवानी रोड, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी बाबाजी चव्हाण (वय ५९) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाबाजी चव्हाण हे घरात बसले होते. त्यावेळी अनोळखी दोघे त्यांच्या घरात घुसले. काही कारण नसताना दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. पुढील तपास पोलीस हवालदार काझी करत आहेत.