नाशिक – विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : सासरच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पवारवाडी, जेलरोड येथील संशयित पती नितीन धनराज ठाकरे, सासरे धनराज राजाराम ठाकरे, सासू जनाबाई ठाकरे, दीर सूरज ठाकरे, नणंद ताई ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आशा उर्फ दिव्या नितीन ठाकरे (वय १९) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आशा ठाकरे या सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींना त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. नोकरी लावण्यासाठी माहेरुन तीन लाख आणावेत, अशी पती नितीन ठाकरे याने पत्नी आशा ठाकरे यांच्याकडे वारंवार मागणी केली. तू माहेरवरुन पैसे आणले नाहीतर तुला नांदवणार नाही. तुला मारुन टाकू, अशी धमकी त्याने पत्नीस दिली होती. त्यातून ती मानसिक ताणतणावाखाली होती. तिने छळास कंटाळून आत्महत्या केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक हांडोरे करत आहेत.
सोन्याचे दागिने, रोकड लंपास
नाशिक : दरवाजा उघडा दिसताच चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना ऋषिराज हारमनी, जाधव नगर, गंगापूर रोड येथे घडली. याप्रकरणी सीमा महिंद्र सिंघानीया यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा सिंघानीया यांच्या सासू घरात असताना त्यांच्या नजर चुकीने दरवाजा उघडाच राहिला. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्याच्या बांगड्या, पेंडल, चेन आणि ३५ हजार रुपये असा एकूण ३ लाख ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार करत आहेत.