नाशिक – मनाई आदेशाचे उल्लंघन; आमदारासह भाजच्या पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत विनापरवानगी भाजपच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद रफिक अब्बास शेख यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आमदार राहुल ढिकाले, आमदार सीमा हिरे, हिमगौरी आडके-आहेर, छाया देवांग, विजय साने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, विनापरवानगी आंदोलन करु नये, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आदेश लागू केला आहे. तरीही, भाजपच्या पदाधिकार्यांनी विनापरवानगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर धरणे आंदोलन केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करत आहेत.