नाशिक : स्वागताचे बॅनर लावणे एका नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सेनेच्या नगरसेवकासह बॅनर बनविणा-या सटाणा येथील राहूल प्रिन्टर्सच्या मालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक डी.जी.सुर्यवंशी आणि राहूल आहेर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शनिवारी (दि.२०) नाशिक दौ-यावर होते. पाथर्डी फाटा ते सिडकोतील शुभम पार्क दरम्यान नगरसेवक सुर्यवंशी यांनी स्वागताचे बॅनर्स लावले होते. या मार्गावरील महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या पोलावर ६० पोस्टर्स लावून संबधीतांनी वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.