नाशिक : रस्त्यात वाहन का लावतो अशी विचारणा करीत मुजफ्फर निजाम कोकणी यांना चौघांनी शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याची घटना कोकणीपुरा, जुने नाशिक येथे घडली . याप्रकरणी मुजफ्फर कोकणी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित जुबेर अब्दुल अजीज कोकणी, अक्रम अब्दुल अजीज कोकणी, रशिद अब्दुल अजीज कोकणी, आया समईन कोकणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कोकणी मसाला अॅण्ड किराणा दुकानात मुजफ्फर निजाम कोकणी १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बसलेले असताना जुबेर अब्दुल अजीज कोकणी, अक्रम अब्दुल अजीज कोकणी, रशिद अब्दुल अजीज कोकणी, आया समईन कोकणी आले. मुजफ्फर कोकणी यांना, ’तू रस्त्यात चारचाकी वाहन का लावतो, आम्हाला येण्या-जाण्यासाठी त्रास होतो. तू आमच्या नादी लागलास तर तुला येथे धंदा करू देणार नाही’ अशी धमकी देत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर संशयित चौघांनी मुजफ्फर कोकणी यांना मारहाण केली. यावेळी मुजफ्फर यांचे वडील निजाम हनिफ कोकणी आणि भाचा ऐराफ अस्लम कोकणी भांडण सोडविण्यास आले असता, संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ व दमबाजी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बिडगर करीत आहेत.