जेलरोड येथे बंद घराचे कुलूप तोडून रोकडसह चांदीची मूर्ती चोरीला
नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती चोरून नेल्याची घटना १० नोव्हेंबरच्या सकाळी १० ते ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आई बंगला, स्वामी समर्थ मंदिराशेजारी, अयोध्यानगर, जेलरोड येथे घडली आहे. याप्रकरणी डॉ. विजय चंद्रकांत शहाणे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. विजय चंद्रकांत शहाणे यांचे घर बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ४ हजार रुपये आणि १५०० रुपयांची १० ग्रॅम वजनाची एक चांंदीची मूर्ती चोरून नेली. पुढील तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत.
नाशिकरोड, पंचवटीतून दुचाकी लंपास
नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकरोड व पंचवटीतून दोन दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या घटनेनुसार, पंचवटीतील चिन्मय आश्रमासमोरील चिंचबन रोडवरील हर्षद राजेंद्र बोरसे (वय २२,मूळ रा. न्यायडोंगरी ता.नांदगाव,) यांनी शनिवारी (दि.२०) रात्री पावणे नऊ वाजता दुचाकी (एमएच १५, जीके १३०१) पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. पुढील तपास पोलीस नाईक कोरडे करीत आहेत. दुसर्या घटनेनुसार, बिटको कॉलेजजवळील आयसीआयसीआय बॅकेच्या परिसरात योगेश शिवराम गायधनी (रा. पळसे, ता.नाशिक) यांनी दुचाकी (एमएच १५, एचएल २५८८) पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. पुढील तपास पोलीस हवालदार काझी करीत आहेत.