वायरमनला मारहाण पितापुत्रास अटक
नाशिक : शेतातील इलेक्ट्रीक पोल उभा करण्यासाठी गेलेल्या वायरमनसह ठेकेदाराच्या कामगारांना त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना बेलतगव्हाण ता.जि.नाशिक येथे घडली. या घटनेत वायरमन जखमी झाला असून पोलीसांनी बापलेकास अटक केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शाासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर कचरू आडके (५०) व संदिप कचरू आडके (२९ रा.दोघे नाणेगाव शिवार ता.जि.नाशिक) अशी अटक केलेल्या संशयीत बापलेकाचे नाव आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी वीज कंपनीच्या भगूर सेक्शन भागात कार्यरत असलेले कर्मचारी चंद्रकांत पोपट पाळदे (रा.बेलतगव्हाण) यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात वादळी पाऊसामुळे आडके मळयातील इलेक्ट्रीक पोल पडला होता. त्यामुळे पाळदे रविवारी (दि.१६) ठेकेदार पंडोरे याचे कामगार घेवून सदर ठिकाणी पोल उभा करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. कामगारांकरवी वायरमन पाळदे पोल उभा करीत असतांना बापलेकांसह त्यांच्या समवेत आलेल्या एका नातेवाईकाने कोणाला विचारून पोल उभा केला असे म्हणत पाळदे यांच्यासह कामगारांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी पाळदे यांच्या पाठीत दगड फेकून मारण्यात आला. तसेच सरकारी काम पूर्ण करू न देता कामात अडथळा आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.
….