नाशिकरोड कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पिंपळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी घनशाम बाळू मोहन यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुलतान भिकन तडवी (वय ४०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या कैद्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिकरोड कारागृहातील सुलतान तडवी खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. तडवी यांनी शनिवार, दि. २० नोव्हेंबर रोजी कारागृहातील बॅरक क्रमांक दोनच्या यार्ड तीनमधील पिंपळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कारागृहातील पोलिसांच्या लक्षात येताच त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.
सिडकोत गॅस सिलेंडरसह ५५ हजारांची घरफोडी
नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील गॅस सिलेंडरसह सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांची घरफोडी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी किशोर महाले यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर सुधाकर महाले यांची बहीण मनिषा सुर्वे (रा. एन ४२, रायगड चौक, पवननगर, सिडको) यांच्या घरी चोरी झाले. त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी हॉलमधील ३० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची चेन, १५ हजार रुपयांचे सोन्याचे मणी, १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि भारत कंपनीचा एक गॅस सिलेंडर असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.