१९ वर्षीय महिलेने गळफास घेत केली आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागात राहणा-या १९ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दिव्या नितीन ठाकरे (१९ रा.श्रध्दा रो हाऊस,ठाकरे मळा पवारवाडी) असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. दिव्या ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील पंख्यास अज्ञात कारणातून ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत.
६६ हजार रूपयांचा ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : कुटूंबिय घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी वॉलकंपाऊडवरून पहिल्या मजल्यावर चढत घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६६ हजार रूपयांचा ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सुनिल भाऊलाल साळी (रा.उदय कॉलनी,तोरणानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. साळी कुटूंबियांचे दोन मजली घर आहे. चोरट्यांनी शुक्रवारी (दि.१९) घरात कुटूंबिय झोपलेले असतांना ही चोरी केली. घराच्या वॉलकंपाऊडवरून पहिल्या मजल्यावर चढत चोरट्यांनी तळघरातील कपाटातील सहा हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.