नाशिक : दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल मारण्याची बतावणी करीत एकाने वाहन बाजारातील पल्सर पळवून नेल्याची घटना मालेगाव स्टॅण्ड भागात घडली. या घटनेत दुचाकीवर डबलसिट बसलेल्या कामगारास लोटून देत भामट्याने हे कृत्य केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश अशोक सोनवणे (रा.नवनाथनगर,फुलेनगर) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी मालेगाव स्टॅण्ड परिसरातील वाहन बाजारात काम करणा-या सुजन राजेंद्र ओसवाल (२३ रा.सावता माळीनगर,पंचवटी) या कामगाराने तक्रार दाखल केली आहे. ओसवाल गेल्या मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास हिरे विद्यालयाजवळील अॅटो कन्सल्टन्ट या वाहन बाजारात काम करीत असतांना ही घटना घडली. ग्राहक म्हणून आलेल्या संशयीताने एमएच १५ एफएल ८३३६ या पल्सर दुचाकीस पसंती दर्शवित वाहन खरेदी करण्याची तयारी दर्शविली. यावेळी किंमत ठरवून संशयीताने वाहनावर चक्कर मारण्याचा आग्रह धरल्याने ओसवाल त्याच्या समवेत डबलसिट गेले असता त्याने फुलेनगर भागात फेरफटका मारून नवनाथनगर येथे पाठीमागे बसलेल्या ओसवाल यांना लोटून देत दुचाकी पळवून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चोपडे करीत आहेत.