नाशिक – विनापरवानगी छटपुजेचे आयोजन; शिवसेनेच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी शहरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मनाई आदेश जारी असतांना विनापरवानगी छटपुजेचे आयोजन करून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव सिताराम पोरजे (रा.वडनेरगेट,नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. कोरोनामुळे शहरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. उत्तर भारतीयांची छटपूजा घरी राहूनच साजरी करण्याचे आवाहन केले जात असतांना बुधवारी (दि.१०) शिवसेनेचे नगरसेवक पोरजे यांनी वडनेरगेट भागातील वालदेवी नदीवर विनापरवानगी छटपूजा कार्यक्रम आयोजीत केला. या ठिकाणी शेकडो महिला पुरूषांची गर्दी जमवून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर असून याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक रमेश सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोकाटे करीत आहेत.
गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : गायकवाड मळा भागात राहणा-या ३२ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निखील प्रकाश भोसले (३२ रा.वाल्मिक मंदिराजवळ,गोरेवाडी) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. भोसले याने शुक्रवारी (दि.१२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लाकडी वाश्याला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी शेजारी किरण गाडे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.