पवननगर भागात भरधाव दुचाकीवरून पडल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकीवरून पडल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना पवननगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. रंजना कारभारी कापसे (रा.बालाजी चौक,उत्तमनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. कापसे या गुरूवारी (दि.११) आपल्या पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पवननगर परिसरात त्या भरधाव दुचाकीवरून तोल जावून पडल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात करण्यात आली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. अविनाश गुलाब रणदिवे (रा.गणेश मंदिराजवळ,शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयीत तडीपाराचे नाव आहे. रणदिवे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.१२) युनिट १ च्या पथकास तो कार्बन नाका भागात आला असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी छत्रपती शिवाजी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक सापळा लावून त्यास जेरबंद केले असून याप्रकरणी युनिटचे प्रदिप म्हसदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहेत.