नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शहरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मनाई आदेश जारी असतांना कार्यक्रम आयोजीत करणा-यांना पोलीसांनी लक्ष केले आहे. याबाबत थेट गुन्हे दाखल केले जात असून गुरूवारी (दि. ११) वेगवेगळया ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाप्रकरणी अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणपती मंदिर वर्धापन,दिपावली स्नेहमिलन आणि किर्तनाचा कार्यक्रम घेणा-या आयोजकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवारी सिडकोतील श्री संत शक्तीधाम स्वामी समर्थ उद्यानात हभप इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ५०० ते ६०० महिला पुरूषांनी उपस्थीती लावल्याने आयोजक तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे (रा.मोरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई वैभव घुले यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरा प्रकार पाटीलनगर भागात घडला. वरद विनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वतीने सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. विनापरवानगी हा कार्यक्रम आयोजीत करून १०० ते १५० नागरीक एकत्र जमविल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी शिपाई किरण भोर यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. तिसरा प्रकार वडाळा पाथर्डी मार्गावरील सुदर्शन लॉन्स येथे समोर आला. भारतीय जनता पार्टीच्या जुने नाशिक व द्वारका मंडळ तर्फे विनापरवानगी या ठिकाणी दिपावली स्नेह मिलनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाजपाचे गिरीष पालवे,सतिश सोनवणे,शाम बडोदे,भगवान दोंदे,सुनिल देसाई,चंद्रकांत खोडे,साहेबराव आव्हाड,नगरसेविका सुमन भालेराव,अर्चना थोरात,पुष्पा आव्हाड,साईन मिर्झा,सचिन कुलकर्णी,रूपाली निकुळे,साहेबराव आव्हाड,वसंत आव्हाड आदींविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भोजणे करीत आहेत.
…